पुणे : स्टार प्रकल्पांतर्गत राज्यातील ४८ शिक्षक व २ अधिकारी असे एकुण ५० जण नाविन्यपूर्ण उपक्रमांची, योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी सिंगापूरचा अभ्यास दौरा करणार आहेत. २२ ते २७ मार्च या कालावधीत हा अभ्यास दौरा होणार आहे. स्टार प्रकल्पातंर्गत देशातंर्गत व देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी प्रती व्यक्ती दोन लाख रुपये याप्रमाणे १५० व्यक्तीकरीता तीन कोटी रुपये तरतूद मंजूर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या वैविध्यपूर्ण, नाविन्यपूर्ण उपक्रमांची, योजनांची माहिती जाणून घेऊन या उपक्रमांची आपल्या राज्यात अंमलबजावणी करण्याची शक्यता पडताळणी करण्याच्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा काढण्यात येत आहे. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च शालेय शिक्षण विभागांतर्गत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदे मार्फत स्टार्स प्रकल्पांतर्गत तरतूदीतून करण्यात येणार आहे. दौरा पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्यासंबंधीचा विस्तृत अहवाल प्रशासकीय विभागास तसेच सामान्य प्रशासन विभागास सादर करावा लागणार आहे. दौऱ्यात प्राप्त केलेल्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग अन्य अधिकारी, शिक्षक यांना प्रशिक्षण देण्यासाठी करावा लागणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी आदेश जारी केले आहेत.