Pune : परीक्षांच्या काळात पोषण पंधरवडा?

पुणे : पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ८ ते २५ एप्रिल या कालावधीत पोषण पंधरवडा जाहीर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. राज्यात शाळांमध्ये संकलित मूल्यमापन चाचणीसह शाळा स्तरावरील परीक्षाही याच काळात होत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या, की पोषण पंधरवड्यातील उपक्रम, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
पोषण अभियान (राष्ट्रीय पोषण अभियान) अंतर्गत उपक्रमाचा एक भाग म्हणून, केंद्र सरकारने पोषण पखवाडा म्हणून घोषित केला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोषणाचे महत्त्व व जागरूकता निर्माण करून आरोग्य आणि निरोगीपणाला प्रोत्साहन देणे आहे. मात्र, पोषण पंधरवड्यातील उपक्रम परीक्षांच्या कालावधीत घेणे अशक्य असल्याची भूमिका शिक्षक संघटनांनी घेतली आहे.
पोषणाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती, संतुलित आहाराची सवय आणि मिशन पोषण २.० अंतर्गत प्रेरणादायी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी शाळांमध्ये कार्यक्रम घ्यावे लागणार आहेत. त्यात संतुलित आहार, पोषण, आरोग्य याविषयी संवादात्मक व्याख्याने व चर्चासत्रे, तज्ञ व्याख्याते, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन, साक्षरता मोहिमेअंतर्गत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पोस्टर्स, स्किट्स, व्हिडिओ तयार करणे, पोषणाशी संबंधित माहितीचा प्रचार व प्रसारित करणे, स्वदेशी खेळण्यांचा मेळावा, अंगणवाडी सेविकांबरोबर उपलब्ध वस्तू व साहित्यांपासून खेळणी बनवण्याच्या कार्यशाळा,
लोककला व पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर, चित्रकला, निबंध लेखन, भाषण व प्रश्नमंजूषा स्पर्धा, पोषण नायक-नायिका निवड, विद्यार्थ्यांच्या सहभागातून सर्जनशीलता वाढवणे कुटुंबातील खाण्याच्या सवयी, पौष्टिक आहार यावर चर्चा, घरचे आरोग्यदूत संकल्पना, पारंपरिक आणि स्थानिक अन्नाला प्रोत्साहन देणे, आरोग्य आणि स्वच्छता जागरूकता याला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांना या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावेत, तसेच योग्य पोषणाचा संदेश आणि त्याचा विद्यार्थी विकासावर होणाऱ्या परिणामाबाबत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन द्यावे. आयोजित कार्यक्रमांची माहिती, सहभागी विद्यार्थी, पालकांची संख्या आणि इतर उल्लेखनीय बाबींचा समावेश असलेला अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जारी केले आहेत.




