पुणे: आता, पाण्याची चिंता मिटली…; खडकवासला धरणात वर्षभराचा साठा

पुणे – पुणेकरांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता आता मिटली आहे. आज दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे तसेच धरण साखळीतून येणाऱ्या प्रवाहामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे.
धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्यास गुरुवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली असून कालव्याद्वारे एक हजार क्युसेक तर नदीत 3 हजार 400 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
दरम्यान, खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 20.42 टीएमसी म्हणजे 70 टक्के इतका जमा झाला आहे. खडकवासलाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने नदीत सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात होता.
पर्यटकांनी धरणावर जाऊ नये…
खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच घाटमाथा व पाणलोट क्षेत्रात पाऊस जास्त आहे, त्यामुळे खडकवासला धरण किनारी पाणी पातळी जास्त आहे. नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्याच्या बाजुला पर्यटकांनी जाऊ नये. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.





