Pune: पाणी मिळत नाही…; ३४ गावांतूनही करता येणार तक्रार

पुणे – महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील तसेच पीएमआरडीए हद्दीतील गावांमधील नागरिकांना आता आपल्या पाण्याच्या समस्या थेट महापालिकेसमोर मांडता येणार आहेत. या तक्रारींची दखल घेतली गेली आहे किंवा नाही याची माहिती आता महापालिकेस सादर करावी लागणार आहे.
त्यासाठीचा ई-मेल आयडी जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या तक्रारी या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. या प्रकरणातील जनहित याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या निर्णयानुसार हा ई-मेल जाहीर करण्यात आला.
महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांसह पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील गावांमधील पाणी पुरवठ्यासंदर्भात वाघोली हाउसिंग सोसायटी असोसिएशन व इतरांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीएकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे व पिंपरी महापालिकांचे आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांची समिती नेमण्यात आली आहे.
या समितीच्या बैठकीत नागरिकांकडून पाणी प्रश्नाबाबत येणाऱ्या तक्रारींसाठी ई-मेल आयडी उपलब्ध करून द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने हा ई-मेल आयडी तयार केला आहे. नागरिकांना पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारी [email protected] या ई-मेल आयडीवर नोंदविता येणार आहेत.





