Pune : पोलिसांकडे एकही तक्रार नाही; किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत

पुणे – शहरात आठही विधानसभा मतदारसंघांत मतदान प्रक्रिया बुधवारी शांततेत पार पडली. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता कोठेही मोठा अनुचित प्रकार घडला नाही. स्थानिक पोलिसांसह जागोजागी तैनात करण्यात आलेला पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्ताचा फायदा झाला आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक झोनचे उपायुक्त, सहायक आयुक्त, गुन्हे शाखा अपर आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्तांसह ६०० पोलीस अधिकारी, ६ हजार ८०० पोलीस मलदार, १ हजार ७५० होमगार्डसह सुरक्षा यंत्रणेच्या १७ कंपन्या मतदानादिवशी विविध भागात दक्ष होत्या. मतदान कक्ष बंदोबस्त, संवेदनशील मतदारसंघातील नियोजन, बोगस मतदान रोखण्यासाठी प्लॅनिंग, पोलिस अधिकार्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे अनुचित प्रकार घडले नाहीत. किरकोळ वादविवाद वगळता मोठ्या घटना टाळण्यास पोलिसांना यश आले आहे.
विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (दि. २०) रात्री पावणेआठ वाजेपर्यंत मतदान पार पडले. त्यानंतर प्रत्येक बुथवरील मतपेटी सील करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू होते. त्याठिकाणी मतदारांच्या रांगा लावणे, त्यांना शिस्तबद्धपणे मतदानासाठी कक्षात सोडण्याचेही काम पोलिसांनी केले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस कर्मचार्यांसह होमगार्डने बंदोबस्ताची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती.
बुथच्या परिसराची व्हिडिओ चित्रीकरण, संवेदनशील असलेल्या इमारतीत पोलिसांच्या मायक्रो प्लॅनिंगनुसार बंदोबस्त पार पाडला. इन्स्टंट रिस्पॉन्स टीमने पाच ते दहा मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, शहराच्या वेगवेगळ्या भागात तसेच मतदान केंद्रांच्या परिसरात बंदोबस्त ठेवला होता. उपनगरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांच्या पथकाकडून गस्त घालण्यात आली. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा घालणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.





