पुणे – आमच्या काळात बंड नव्हते. आम्ही एकत्र बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायची. यशंवतराव चव्हाण यांची विचारधारा लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आला होता. याला लोकांनी पाठिंबा दिला होता, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला. पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांनी संवाद साधला. अजित पवार आणि तुम्ही केलेल्या बंडात काय फरक आहे, असे विचारले असता पवार म्हणाले की, आज कोणी काय केले, त्यांच्या तक्रारी करायची नाही. फक्त पक्ष महत्त्वाचा आहे, त्याचा संस्थापक कोण आहे, हे लोकांना माहित आहे, या पक्षाला कोणी मोठे केले आहे, या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर आहे, त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही. मागील 10 ते 15 वर्षांपासून बारामती आणि तेथील कामात लक्ष्य घातले नसल्याचे सांगत पवार यांनी सांगितले की, पंचायत समिती, साखर कारखाना, अन्य संस्थांवरील पदावर कोणी जावे, कोणी त्या ठिकाणची जबाबदारी घ्यावी, त्यासंबंधी एकही निर्णय मी घेतलेला नाही. नवीन पिढीने पुढे येऊन त्या जबाबदाऱ्या घ्याव्यात असे मला वाटते. सगळ्यांना बरोबर घ्यावे, नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घ्यावे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळणार की नाही याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, मी स्वत: प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घ्यायला हवे, असे मत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले आहे.