Pune: तूर्तास पाणी कपातीचा निर्णय नाही

पुणे : खडकवासला प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प आराखड्यानुसार मंजूर कोट्यानुसार पुणेकरांकडून पाण्याचा वापर सुरू आहे. त्यामुळे पुण्यात पाणी कपातीचा कोणताचा निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तूर्तास पाणीकपात टळली असली, तरी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही विखे- पाटील यांनी पुणे महापालिका प्रशासनास दिले आहेत.
कौन्सिल हाॅल येथे कालवा समितीच्या बैठकीनंतर विखे- पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात ३४ गावे समाविष्ट झाली आहेत. या नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता, शेतीसाठी आवर्तनाचा दबाव, वाढत्या शहरीकरणाचा विचार करता सर्वांना पाणी उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. या सर्व गोष्टींवर बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. काही आमदारांनी आक्षेपही नोंदविले असून, त्याचे निराकरण करण्यात आले. या बैठकीत पुण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय झाला नाही, असेही ते म्हणाले.
पुण्यात किती टक्के पाणी वाया जात आहे, किती प्रमाणात पाण्याची गळती होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जवळपास पाण्याचा ६५ टक्के पुनर्वापर होणे आवश्यक आहे. त्या तुलनेत किती टक्के पाण्याचा पुनर्वापर होतो, याबाबतच्या आवश्यक सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दोन्ही महापालिकांना देण्यात आले आहे.
या सर्व माहितीनंतर पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे. त्यात पुण्याच्या पाण्याविषयी निर्णय घेण्यात येणार असल्याचे विखे- पाटील यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या पाणीबिल थकबाकीविषयी विखे- पाटील म्हणाले, की महापालिका प्रशासनाकडून मार्चअखेर टप्प्याटप्प्याने थकबाकी भरण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही.





