पुणे: विद्यापीठांत धार्मिक द्वेषाचे विखार नको: मंत्री छगन भुजबळ

सर्व धर्मांतील मुलांना शिक्षण मिळावे
पुणे – राजकारणी धार्मिक तेढाचे विष विद्यापीठात आणत आहे. ते कोणत्याही विचारधारेचे असले, तरी त्यांनी धर्मिक द्वेषाचे विखार विद्यापीठांमध्ये आणू नये. हे प्रकार तातडीने थांबवावे, असे आवाहन अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विद्यापीठाच्या
कार्यक्रमात राजकीय पक्षाच्या नेत्यांना केले.
शिक्षणसंस्थांमध्ये हिजाबच्या मुद्द्यावर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय पक्षांना टोला लगावत भुजबळ यांनी हिजाबच्या वादावरून आपली भूमिका स्पष्ट केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे सर्वांचे आहे. हिंदू, मुस्लीम, शीख अशा सर्व धर्मांतील मुलांना मिळायला पाहिजे. शिक्षणामधूनच त्यांची मनोवृत्ती बदलणार आहे.
आपल्याला सर्वांना घेऊन चालायचे आहे,’ असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. जाती-धर्मात लढाई नको, असे महात्मा फुले यांनी आम्हाला शिकवले आहे. करोनानंतर आता शाळा-महाविद्यालये सुरू होत आहेत. या वयात मुलांच्या मनात अशाप्रकारचे भेदाभेद, राग, द्वेष निर्माण केला तर मग शिक्षणाचा काय फायदा? शिक्षणाचा हेतू समाजाला, देशाला एकत्रित येऊन पुढे घेऊन जाण्याचा आहे. अशाप्रकारचे वाद वाढणार असतील तर चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही भांडणे, वाद शैक्षणिक ठिकाणी करू नये, अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली.
ओबीसी आरक्षणासाठी फडणवीसांचेही सहकार्य
ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार असे आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. कोणी काहीही बोलत असले, तरी गरजेच्या वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सहकार्य मिळाले आहे. गोरगरीब लोकांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. त्यासाठी कोणतीही रस्त्यावरची लढाई किंवा समाजांमध्ये भांडण नको.
चर्चेच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. आरक्षणासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांचे खंबीर पाठबळ आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेही सहकार्य आहे. त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळेल, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.





