Pune: परीक्षा पद्धत बदलांबाबत अंतिम निर्णय नाही – शरद गोसावी

पुणे – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा पद्धतीत बदल करण्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. परीक्षा पद्धतीतील बदल, अभ्यासक्रमातील बदल करण्याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (विद्या प्राधिकरण) अभ्यास सुरू आहे. सत्रनिहाय परीक्षा घेणे अडचणीचे ठरू शकते.
कोणताही बदल करायचा झाल्यास त्याची पूर्वसूचना एक वर्ष आधी काढणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नवीन शैक्षणिक धोरणात दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रनिहाय घेण्याबाबत सुचविले आहे. यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सत्रनिहाय परीक्षा घेण्याची चाचपणी केली. मात्र, त्याऐवजी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याबाबत त्यांनी नव्याने विचार सुरू केला आहे.
राज्य मंडळाकडून आगामी फेब्रुवारी- मार्च महिन्यात सुरू होणारी परीक्षा १५ ते २० दिवसांपूर्वी आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. परीक्षा वेळेत संपून निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल मे मेहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याबाबत विचार करण्यात येणार आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे ३२ लाख विद्यार्थी बसतात. ही संख्या खूप जास्त असल्याने परीक्षा ही विभागून सत्रनिहाय घेतल्यास शिक्षक, कर्मचारी आणि राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांचा वेळ हा परीक्षेचे आयोजन करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंत जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सत्रनिहाय करायची असल्यास भरपूर वेळ जाणार आहे. याचा विपरित परिणाम हा शैक्षणिक अध्यापनावर होऊ शकतो, असे गोसावी स्पष्ट केले.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून जेईई परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्याला दोनदा परीक्षेची संधी मिळते. सर्वाधिक गुण असलेल्या परीक्षेचे गुण हे पुढे जेईई अॅडव्हान्स्डसाठी ग्राह्य धरण्यात येतात. राज्य सामाइक परीक्षा कक्षाकडून आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यामुळे दोन्ही यंत्रणांशी संवाद साधून परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे, असेही गोसावी म्हणाले.





