Pune : तपासात कोणतीही हयगय केली जाणार नाही
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी योग्य प्रकारचे इंटलिजन्स प्राप्त करून, ट्रॅप लावून या प्रकरणातील आणखी एक आरोपी नीलेश चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. मी पहिल्या दिवशीच सांगितले आहे की, या प्रकरणात जेवढे लोक सामील आहेत, त्यात कोणालाही सोडले जाणार नाही, कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही. अतिशय कडक शिक्षा झालीच पाहिजे, असा आमचा प्रयत्न असणार आहे, असे स्पष्ट प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतानी दिली. ते पुणे दौऱ्यावर आहेत.
या प्रकरणात पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचेही नाव आले आहे. त्यांनी हगवणे यांना शस्त्रपरवाना दिला आहे. ज्यात हगवणे कुटुंबियांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे, याविषयी विचारले असता, अशाप्रकारची तक्रार आली आहे; त्यात किती तथ्य आहे हे पाहण्यासाठी मी सांगितले आहे.
दुसरे म्हणजे कोणत्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये आणि गडबड करू नये या अनुषंगाने आम्ही काही निर्णय घेतले आहेत, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली. तसेच गेल्या दोन वर्षांत ६०० शस्त्रपरवाने दिले आहेत, त्यांचाही आढावा घेण्यात येईल आणि चुकीच्या माहितीच्या आधारे परवानगी दिल्या असतील तर त्या रद्द केल्या जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सुमारे अडीच हजार सरकारी नोकरदार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीला आले आहे. याविषयी विचारले असता, या योजनेच्या नियमांच्या कक्षेत नसलेल्या काही महिलांनी अर्ज करून त्या काळात लाभ घेतला आहे याची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही याची सातत्याने चौकशी करीत आहोत. त्यातून जे जे असे सापडत आहे त्यांचे नाव कमी केले जात आहे. याचे काम सुरू असून, पूर्ण झाल्यावर याची माहिती देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.





