Pune : ट्रंक लाइन केल्याशिवाय बिल नाही; ठेकेदारास पालिकेने खडसावले

पुणे – मुळा- मुठा शुद्धीकरण प्रकल्पाच्या (जायका) अंतर्गत शहरात उभारण्यात येणाऱ्या ११ सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रिया प्रकल्पांपैकी १० प्रकल्पांचे काम ८० ते ८५ टक्के झाले आहे. मात्र, सांडपाणी वाहून नेण्यासाठी आवश्यक असलेल्या ४९ किलोमीटर लांबीच्या ट्रंक लाइनच्या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने केवळ ९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
त्यामुळे महापालिकेने संबंधित ठेकेदारांचे कान टोचले असून, जलवाहिनीचे काम वेळेत केले, तरच कामाची बिले जातील, असा सज्जड दम दिला आहे. रखडलेल्या कामातील २० किलोमीटर सांडपाणी वाहिनीचे काम पुढील महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
जायका प्रकल्पांतर्गत १४७१ कोटी खर्च करून ३१६ एमएलडी क्षमतेचे ११ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातील दहा प्रकल्पांचे काम ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असून, यातील वडगाव, वारजे, खराडी, हडपसर आणि मुंढवा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे.
मार्च २०२६ मध्ये उर्वरीत प्रकल्प सुरू केले जातील. या प्रकल्पांसोबतच पालिकेकडून नदीत येणारे १०० टक्के सांडपाणी संकलित करण्यासाठी, तसेच हे पाणी थेट प्रकल्पात आणण्यासाठी ४९ किलोमीटरच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे कामही प्रकल्पाचे काम करणाऱ्या ठेकेदारास दिले आहे.
यात फारसा फायदा नसल्याने आधी प्रकल्पांचे काम ठेकेदाराने हाती घेतले. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम मागे पडल्याने केंद्रशासन, तसेच जायकाच्या प्रतिनिधींनी पालिकेत झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पालिकेने ठेकेदाराची कानउघडणी करत महिन्यात २० किलोमीटरच्या ट्रंक लाइनचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
१९ अभियंत्यांची स्वतंत्र टीम
हे २० किलोमीटरचे काम शहरात वेगवेगळ्या १९ ठिकाणी केले जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराकडून स्वतंत्र अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. असे असतानाही महापालिकेने स्वतंत्रपणे १९ अभियंते नेमले आहेत. त्यांना दररोज किती काम झाले, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. थेट केंद्रानेच या कामाबाबत नाराजी व्यक्त केल्याने महापालिका प्रशासन या कामावर विशेष लक्ष केंद्रित करत आहे.





