Pune News : मोबाईल फॉरमॅट केल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण; राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
मोबाईलमधील डेटा नजरचुकीने फॉरमॅट झाल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून तांब्याच्या बाटलीने डोक्यात तीन-चार वेळा मारहाण केल्याची घटना बुधवार पेठेत घडली.

Pune News – मोबाईलमधील डेटा नजरचुकीने फॉरमॅट झाल्याच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून तांब्याच्या बाटलीने डोक्यात तीन-चार वेळा मारहाण केल्याची घटना बुधवार पेठेत घडली. त्यानंतर डेटा रिकव्हर करण्यासाठी गेलेल्या ठिकाणीही संबंधित तरुणाने लाकडी बांबूने मारहाण केल्याची तक्रार फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
क्षितीज सागर पवार ( २०, रा. बुधवार पेठ) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. त्याच्या तक्रारीवरून पृथ्वीराज गजानन पंडीत ( ३०, रा. तपकिर गल्ली, बुधवार पेठ) याच्याविरुद्ध पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडीत हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून पवार त्याच्यासाठी व्हिडीओ एडिटिंगचे काम करीत होता. २४ सप्टेंबर रोजी पंडीतने त्याच्या मोबाईलमधील काही व्हिडीओ एडिट करण्यासाठी पवारला दिले होते. त्याचे काम करून दिल्यानंतर पवारने मोबदला मागितला असता, नंतर पैसे देतो, असे सांगून पंडीत निघून गेला होता.
दरम्यान २८ सप्टेंबर रोजी रात्री पवारने पैशांसाठी पंडीतला फोन केला. त्यावेळी पंडीतने व्हिडीओचे काम असल्याचे सांगून त्याला कसबा गणपती मंदिराच्या कमानीजवळ बोलावून घेतले. पवार हा मित्रासह तेथे गेला. पंडीतने त्याचा ॲपल कंपनीचा मोबाईल पवारकडे दिला. त्यामध्ये व्हिडीओ एडिट करताना नजरचुकीने मोबाईल फॉरमॅट झाल्याचे पवारच्या लक्षात आले.
मोबाईल फॉरमॅट झाल्याचे समजल्यानंतर पंडीत रागावेल, या भीतीने पवारने मोबाईल त्याच्याकडे दिला आणि रात्री दीडच्या सुमारास घरी गेला. दुसऱ्या दिवशी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंडीत पवारच्या घरी आला. मोबाईल फॉरमॅट का केला?, अशी विचारणा करून त्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरवाजाजवळील तांब्याची बाटली घेऊन पवारच्या डोक्यात तीन-चार वेळा मारली. त्यानंतर मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी दोघे जे. एम. रोडवरील दुकानात गेले. तेथे डेटा रिकव्हर न झाल्याने ते नारायण पेठेतील मारुती चौक परिसरातील दुसऱ्या दुकानात गेले.
तेथे काही वेळ लागेल, असे दुकानदाराने सांगितल्यानंतर पंडीतने दुकानाबाहेर पडून बाजूला असलेल्या लाकडी बांबूने पवारला मारहाण केलीयानंतर पंडीतच्या घराजवळही पवारला हाताने मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पवारने पोलिस चौकीत धाव घेतल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.





