पुणे – उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता. हा खूनाचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा आणि उरुळीकांचन पोलिसांनी संयुक्तीकरीत्या उघडकीस आणत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तरुणीने अत्याचारास विरोध केल्याने रागाच्या भरात आरोपीने तीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. दिनेश संजय पाटोळे (वय २६, रा. गोळेवस्ती, उरुळीकांचन) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी उरुळीकांचन–नायगाव रस्त्यावरील प्रयागधाम हॉस्पिटलजवळ एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ मोबाईल फोन, चप्पल आणि सॅंक पडलेले होते. डोक्यात गंभीर जखम झाल्याचे दिसून येत होते. तपासात हा मृतदेह पूनम विनोद ठाकूर (२०, रा. गगन आकांक्षा सोसायटी, कोरेगाव मुळ, ता. हवेली, जि. पुणे) हीचा असल्याचे उघड झाले. या प्रकरणी तरुणीचा भाऊ मनीष विनोद ठाकूर (२३) यानी दिलेल्या गुन्हा नोंदविण्यात आला होता. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी (परिक्षेत्र कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली चार तपास पथके गठित करण्यात आली. सुमारे ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले व २०० ते २५० लोकांचे जबाब घेण्यात आले.तपासात सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित व्यक्ती मोटारसायकलवरून घटनास्थळी जाताना आढळली. संशयीताची ओळख पटताच त्याच्या त्यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, मयत तरुणी ही पायी जात असताना त्याने तिच्याकडे अशोभनीय मागणी केली. मात्र तिने विरोध केल्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यात दगड मारून खून केला. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक सचिन बांगडे , सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे, दत्ताजीराव मोहिते यांच्या पथकाने केली.