Pune News: कोंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : कोंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साबिया इरम अक्रम खान या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साबिया खान हिच्याविरुद्ध नौशीन फैय्याज शेख यांनी तक्रार दिली होती. किरकोळा वादातून तक्रार दिल्याने पाेलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती.
सोमवारी (२२ जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास साबिया कोंढवा पोलीस ठाण्यात आली. तिने पोलीस ठाण्याचे कामकाज सांभाळणारे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही दहावी उत्तीर्ण पोलीस आहात.
आमच्यामुळे तुमचा पगार होतो. मी उच्चशिक्षित असून, तुमची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे’, अशी धमकी तिने दिली. पोलीस ठाण्यात अरेरावी करून तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
साबिया खानने पोलीस ठाण्यात ठेवलेल्या गुन्हे नोंदविण्याच्या वहीचे पान फाडून टाकले. त्यावेळी जमदाडे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने जमदाडे यांच्या कानाखाली मारली.
‘तू पोलीस ठाण्यात बाहेर. ये तुझ्याकडे बघते’, अशी धमकी दिली. साबिया खानविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करत आहेत.





