Pune News : महिलेची ३५ लाखाची फसवणूक; एकाचा जामीन फेटाळला

पुणे : शेअर बाजारात ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदी करण्यास भाग पाडून ३५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात एकाचा जामीन सत्र न्यायाशीध एस.आर. नरावडे यांनी फेटाळला.
सलमान मन्शुर शेख (वय २३, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह एकुण सात जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पाषाण येथील महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील संजय पवार यांनी बाजू मांडत जामिनास विरोध केला होता.
एका व्हॉट्स अप ग्रुपच्या ॅडमिनने ट्रेडिंग आणि आयपीओ खरेदीमधून आकर्षक परतावा देण्याचे अमिष फिर्यादींना दाखविले. त्यानुसार त्यांनी ३१ लाख ६० हजार रुपये गुंतविले. त्यांनी वेळोवेळी परतावा मागितला.
मात्र, त्यांना देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी रक्कम परत मागितली. रक्कम परत हवी असेल, तर चॅरिटी डोनेशन स्वरूपात ४ लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतरही त्यांना रक्कम परत मिळाली नाही.
त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणात सलमान याला अटक केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता.




