पुणे | खडकीत वाहनांची तोडफोड, दोघांवर शस्त्रहल्ला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडकी परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. यावेळी त्यांना रोखणाऱ्या दोन तरुणांवर शस्त्राने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली.
याप्रकरणी अलंकार प्रेम कांबळे (२६, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी), गणेश सुधन्यम पिल्ले (२६), ऋतिक उर्फ मल्हार संजय अवघडे (२५, दोघे रा. महादेववाडी, खडकी) यांच्यासह एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कासिम निजामुद्दीन शेख (२६, रा. इंदिरानगर वसाहत, खडकी) याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पिल्ले आणि अवघडे यांना अटक केली आहे.
आरोपी कांबळे, पिल्ले, अवघडे आणि साथीदाराने खडकी बाजार परिसरातील इंदिरानगर वसाहतीतील रिक्षाची तोडफोड केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. शेख आणि त्याचा मित्र रोहन करडे यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर शस्त्राने वार केले. आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले. तेव्हा आरोपींनी हवेत शस्त्रे उगारून दहशत माजविली. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करत आहेत.





