Pune News | पंतप्रधानांसाठी पुण्यातून प्रकाशाची आरती! महाराष्ट्रात पहिलाच थ्रीडी ड्रोन शो ; केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी केले आयोजन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त (१७ सप्टेंबर) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेतून संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. याविषयी मंत्री मोहोळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरला देशभरात सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. पूर्वसंध्येला (दि. १६) पुण्यात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ड्रोन शोसह दिव्यांग सहाय्यता शिबीर आणि संगीत रजनीचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर केले आहे.
ज्योतीने तेजाची आरती, या ड्रोन शोद्वारे पुणेकरांच्या वतीने पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येणार आहेत. अयोध्या आणि वाराणसीनंतर महाराष्ट्रात हा ड्रोन शो प्रथमच होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.थ्रीडी स्वरूपात असलेला हा ड्रोन शो ४५ मिनिटे असेल. हजारो ड्रोन्स जेव्हा अवकाशात झेपावतील, तेव्हा पुण्याच्या ३ ते ४ कि.मी. परिसरातील नागरिकांना हा शो अवकाशात पाहता येणार आहे. ड्रोन द्वारे केलेल्या फॉर्मेशन्समधून विकसित भारताच्या दिशेने झालेल्या प्रवासाचे नयनरम्य दर्शन पुणेकरांना घडेल, अशी अपेक्षा मोहोळ यांनी व्यक्त केली.
१६ सप्टेंबरला स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी दोन ते सायं. सहा वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी पाच ते १० वाजेपर्यंत संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांचा गाण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री आठ वाजता हा ड्रोन शो होईल, असे मोहोळ यांनी नमूद केले. याशिवाय पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान मोदी यांना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देणार आहेत, हे शुभेच्छा संदेश थेट पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात येणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले.




