Pune : प्रेक्षकांना इच्छा असूनही चित्रपट पाहता येत नाही – उषा नाडकर्णी
Pune : मल्टिप्लेक्समधील महागड्या तिकिटांमुळे अनेक सर्वसामान्य प्रेक्षकांना इच्छा असूनही चित्रपट पाहता येत नसल्याची खंत ज्येष्ठ सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली.

Pune : मल्टिप्लेक्समधील महागड्या तिकिटांमुळे अनेक सर्वसामान्य प्रेक्षकांना इच्छा असूनही चित्रपट पाहता येत नसल्याची खंत ज्येष्ठ सिने अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली. पुण्यात बालगंधर्व रंगमंदीरात आयोजित करण्यात आलेल्या मराठी नाटय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी नाडकर्णी यांची भूमिका असलेला गांधी टाॅक्स हा सिनेमा दाखवत या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली उपमहापौर परशुराम वाडेकर, चित्रपट महोत्सवाचे संयोजक सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संतोष टेंगळे, बालगंधर्व रंगमंदिरचे व्यवस्थापक राजेश कामठे यांच्यासह महोत्सवाचे संयोजक बाबासाहेब पाटील, नितीन धवणे, कौस्तुभ कुलकर्णी, अपेक्षा चव्हाण आणि अजय फुटाणे यावेळी उपस्थित होते.
नाडकर्णी म्हणाल्या, नाट्यगृहांमध्ये कमी किमतीत चित्रपट उपलब्ध होत असल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी येतात. अशा उपक्रमांमुळे मराठी चित्रपटांना आणि कलाकारांना मोठा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे सर्वच शहरांमध्ये असे महोत्सव नाट्यगृहांमध्ये सातत्याने आयोजित झाले पाहिजेत.
यावेळी बोलताना वाडेकर म्हणाले की, बालगंधर्व रंगमंदिरासह पुण्यातील इतर नाट्यगृहांमध्येही मराठी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यासाठी महापालिका आणि उपमहापौर म्हणून आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. पुणे हे सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखले जात असून अशा उपक्रमांमुळे कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळत आहे.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चित्रपट रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर झालेल्या चित्रपट प्रदर्शनावेळी ‘श्यामची आई’ चित्रपटातील कलाकार तसेच ‘गुलकंद’ चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे उपस्थित होते.
मराठी चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला शहरातील चित्रपट रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.





