प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीची तयारी सुरू झाली आहे. सोडतीची तारीख अद्याप अंतिम झालेली नसली तरी त्यासोबतच आता, निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला जात आहे. त्या अंतर्गत मतदार याद्यांतील घोळ टाळण्यासाठी यंदा विशेष ‘सॉफ्टवेअर’चा उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर मतदार याद्यांची नव्याने विभागणी करावी लागणार आहे. पूर्वी हे काम कर्मचारी करीत असत मात्र यंदा ‘सॉफ्टवेअर’च्या माध्यमातून ही प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील मतदारांची नावे वेगवेगळ्या प्रभागात जाणे किंवा काही नावे वगळली जाणे अशा तक्रारी टाळता येणार असल्याचे दिवटे यांनी स्पष्ट केले.निवडणुकीसाठी पाच हजार मतदान केंद्रांची आवश्यकता असून, त्यासाठी जागांची पाहणी करण्यात येणार आहे. या संदर्भात दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत बुथनिहाय कामांचे नियोजन, केंद्रांची उपलब्धता आणि नवीन मतदान केंद्रांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. मतदान केंद्रांबाबतची जबाबदारी उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे देण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील केंद्रांचा अभ्यास करून, किती ठिकाणी नवीन केंद्रांची गरज आहे आणि त्यासाठी योग्य जागा कशा मिळवाव्यात, याबाबत नियोजन सुरू आहे, असे दिवटे यांनी सांगितले.