Pune News : पालिकेच्या साडेचार कोटींच्या विना-निविदा पुस्तक खरेदीला आयुक्तांनीच लावला ब्रेक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपल्यानंतर महापालिकेच्या शाळांसाठी तब्बल साडेचार कोटी रुपयांची पूरक व व्यवसाय पुस्तके खरेदी करण्याचा विना निविदा खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या मागणीनुसार मध्यवर्ती भांडावर विभागाकडून स्थायी समितीत ठेवण्यात आला होता. मात्र, या विना निविदा खरेदीवर थेट महापालिका आयुक्तांनीच बोट ठेवत हा प्रस्ताव दप्तरी दाखल प्रशासनास खडेबोल सुनावले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीच्या नावाखाली हा प्रस्ताव पुढे आणत स्थायी समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता.
या इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित, इंग्रजी, बुध्दिमत्ता आणि संगणक या विषयांच्या लेखन सरावासाठी ही पुस्तके खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. तसेच, गेल्या काही वर्षांपासून शालेय साहित्य, गणवेश आणि वह्यांसाठी लागणारा निधी थेट पालकांच्या खात्यात जमा करण्याची पद्धत सुरू करण्यात आली असतानाही हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याने प्रशासकीय वर्तूळात याबाबत चर्चा सुरू होती. ही पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय पुस्तके आवश्यक असल्याचे ठरवून काही मुख्याध्यापकांच्या माध्यमातून आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगत काही विशिष्ट प्रकाशकांची पुस्तके निवडण्यात आली.
तसेच, बाजारात अशी सराव पुस्तके सहज उपलब्ध असून, १५ ते २० टक्के सूट देणाऱ्या प्रकाशकांकडून खरेदी करण्याचा प्रस्ताव असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ही खरेदी निविदेशिवाय करण्यात येणार असल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. मात्र, ही बाब लक्षात आल्यानंतर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी याबाबत नाराजी व्यक्त हा प्रस्ताव रद्द केला आहे.





