PUNE NEWS : टिमवि कुलगुरूपदी डॉ. गीताली टिळक

पुणे -टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. गीताली टिळक यांची पुढील पाच वर्षांसाठी नियुक्ती झाली असून, त्यांनी आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाप्रमाणे तीन सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार निवड प्रक्रिया करण्यात आली.
गेली दोन वर्षे डॉ. गीताली टिळक या प्रभारी कुलगुरू म्हणून काम करीत होत्या. डॉ. टिळक या संगणक शास्त्राच्या पदवीधर असून, त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन आणि मुद्रितमाध्यम या विषयावर पदव्युत्तर पदवी मिळविली आहे.
या दोन्ही विषयात त्यांनी पीएचडी मिळवली. मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटीत त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च केला. विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. विद्यापीठाच्या आधुनिक शास्त्रे व व्यावसायिक कौशल्य विभागाच्या त्या अधिष्ठाता आहेत.
गुणवत्तेस प्राधान्य देणार
टिळक महाराष्ट विद्यापीठाला ऐतिहासिक वारसा आहे. लोकमान्यांचे शैक्षणिक स्मारक असलेल्या विद्यापीठाच्या विस्तारास आणि शैक्षणिक गुणवत्ता जपण्यास आपले प्राधान्य राहील. विद्यापीठाची सुरू असलेली वेगवान वाटचाल सर्वांच्या मदतीने कायम राखण्याचा प्रयत्न राहील. शैक्षणिक गुणवत्तेर विद्यापीठ शिखर ठरेल, हा मला विश्वास वाटतो, अशी प्रतिक्रिया डॉ. गीताल टिळक यांनी दिली.





