Pune News | साखर कारखान्याची जमीन खरेदी नियमांच्या चौकटीतच ; पुणे बाजार समितीच्या बैठकीत मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
पुणे – यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमीन खरेदी करताना सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच व्यवहार करावा, अशी मागणी पुणे बाजार समितीच्या काही संचालकांनी मासिक बैठकीत केली.थेऊर येथील यशंवत सहकारी साखर कारखान्याची सुमारे ९९.२७ एकर जमीन २९९ कोटी रुपयांना पुणे बाजार समितीच्या उपबाजारासाठी खरेदी करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. उच्च न्यायालयातील दाखल असलेल्या रिट याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढील कार्यवाही करायची असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
पणन संचालकांकडून समितीला अद्याप या व्यवहारासाठी परवानगी दिलेली नाही, असे असतना संचालक मंडळ धनादेश काढण्याच्या निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करीत हा व्यवहार थांबवण्याची मागणी फेडरेशन फॉर अॅग्रो, कॉमर्स अॅण्ड ट्रेडने (फॅक्ट) केली होती.बाजार समितीचे माजी सभापती, संचालक दिलीप काळभोर, रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर यांच्यासह अन्य संचालकांनी या जमीन खरेदी-विक्रीस विरोध नाही. मात्र, दोन्ही संस्थाच्या हितासाठी नियमानुसार आणि कायदेशीर बाबींचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. याबाबत बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
“निधी उपलब्ध करून सव्वा वर्षात व्यवहार पूर्ण करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. सातबार्यावरील सर्व देणी देणे, सरकारी मोजणीने जमिनीचा ताबा घेऊन जेवढी जमीन तेवढेच पैसे दिले जातील. याबाबत सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच व्यवहार होईल.”
– प्रकाश जगताप, सभापती, पुणे बाजार समिती





