Pune News : नसरापूर ब्रिजवर एसटीचा अपघात; श्रीराम फायनान्सच्या लिलावामुळे सर्व्हिस रोड ठप्प

नसरापूर : आज सकाळी नसरापूर येथील ब्रिजवर पुणे साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बसला टायर निघाल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातानंतर बस सुमारे ५० फूट घसरत गेली. प्राथमिक माहितीनुसार, बसच्या टायरचा काही वेळापूर्वीच पंचर काढण्यात आला होता. मात्र, टायर पुन्हा नीट बसवण्यात तांत्रिक त्रुटी झाल्यामुळे हा प्रकार घडला.
या घटनेमुळे पुणे-सातारा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यात भर म्हणून, आज श्रीराम फायनान्स कंपनीचा वाहन लीलाव (ऑक्शन) असल्यामुळे मोठ्या संख्येने गाड्या सर्व्हिस रोडवर उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावर देखील वाहतूक ठप्प झाली आहे. स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नसरापूर ग्रामस्थांनी श्रीराम फायनान्सकडून निलावासाठी आलेल्या गाड्यांची योग्य व्यवस्थापनाची मागणी केली असून, अन्यथा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला आहे.





