Pune News : अनुकंपा नियुक्तीला वेग! 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत 240 पेक्षा अधिक उमेदवारांना संधी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – शासनाच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळून त्यांचे पुनर्वसन सुलभ होईल. त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध होऊन कामकाजात गती येईल. जिल्ह्यात ही प्रक्रिया पारदर्शक व सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असून, सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, या कार्यक्रमात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. जिल्हाधिकारी डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला गती देण्यात आली असून, यामुळे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्याबरोबरच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
गट-क पदाकरिता प्रतीक्षा यादीतील 162 उमेदवारांपैकी 97 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली असून, गट-ड पदाकरिता प्रतीक्षा यादीतील 241 उमेदवारांपैकी 147 उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे आणखी 46 उमेदवारांची शिफारस पाठविण्यात आली आहे.





