भवानीनगर : येथील व्यापार पेठेतील श्री ज्वेलर्स अँड सराफ या दुकानाच्या लोखंडी खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश करत 5 लाख 83 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी दुकानाचे मालक प्रसाद चंद्रकांत जाधव यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २४) रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने प्रसाद जाधव आणि त्यांचे मित्र किरण घोरपडे यांच्या मंडई रोडवरील श्री ज्वेलर्स अँड सराफ दुकानात खिडकीचे गज कापून प्रवेश केला. दुकानातील ड्रॉवरमधून ३ लाख ३८ हजार रुपये किमतीची ४५.४०० ग्रॅम वजनाची सोन्याची गोळी, १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे २.१६० किलोग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, छल्ले, गोफ, चैन, मुलांचे कमरेचे करदोडे आणि १ लाख रुपये रोख असे एकूण ५ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य चोरले. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डोनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मिठापल्ली तपास करीत आहेत.