Pune News | शहरात ७५ मॉडेल शाळांचा संकल्प ; शिक्षक गौरव सोहळ्यात आयुक्तांची घोषणा

प्रभात वृत्तसेवा
पुणे – समाजात विद्यार्थी चांगल्या प्रकारे उभा रहावा हे शिक्षकाचे मुख्य उद्दिष्ट असते. शिक्षणात कौशल्य आधारित ज्ञान गरजेचे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. पालिकेतर्फे येत्या वर्षात ७५ मॉडेल स्कूल उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.महापालिकेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन, उपायुक्त विजयकुमार थोरात, प्रशासकीय अधिकारी सुनंदा वाखारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, उपप्रशासकीय अधिकारी शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते. महापालिकेच्या प्राथमिक शाळांमधील १० खासगी शाळांमधील ५ आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले. त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, टॅब देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांना ई-लर्निंग च्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. विविध स्पर्धा परीक्षांना मुलांना बसविले जाते व त्यातूनच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचाविण्याचा शिक्षकांचा सतत प्रयत्न चालू असतो, असेही नवल किशोर राम यांनी सांगितले. पुढील तीन वर्षात सर्व शाळा मॉडेल करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. शिक्षकांनी स्वतः व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी पालिका पुस्तक मेळावा घेणार असून मराठी संस्कृती, भाषा उच्च दर्जाची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.





