वाचन साखळी: पुस्तकाच्या पानांमधून मुलांच्या आयुष्याची दिशा

पुणे – पुस्तकाच्या पानांतून उलगडणारे जग, वाचताना बोटांनी ओळींचा मागोवा घेत फडफडणाऱ्या पानांचा नाद, मनाला स्पर्शून जाणारे वाक्य शिसपेन्सिलीने वळवलेले – हा वाचनाचा खरा आनंद आहे. आणि हाच आनंद लहान वयात रुजवण्याचा नवा प्रयत्न सुरू झाला आहे – ‘वाचन साखळी’ या नावाने.
‘बालक-पालक फाउंडेशन’ या संस्थेने ग्रामीण व निमशहरी भागांतील चौथी ते सातवीच्या मुलांसाठी या उपक्रमाची सुरुवात आज केली. यंदा हा उपक्रम चौथ्या वर्षात प्रवेशतोय. या उपक्रमात महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमधून निवडलेल्या पंचवीस मुलांना चार पुस्तकांचा पहिला संच पोस्टाने पाठवण्यात आला. या पुस्तकांवर त्यांचंच नाव व पत्ता त्यांनी स्वतः लिहिलेला आहे. पुस्तकांच्या पाठोपाठ ट्रॅकिंग आयडीही त्यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत.
सोलापूर, सातारा, धाराशिव, पुणे, रत्नागिरी, नाशिक, अमरावती आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील निवडक तालुक्यांतील मुलांना प्राथमिक टप्प्यात संधी देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात ही वाचनसाखळी अधिक विस्तारली जाईल.
या संचामध्ये निवडण्यात आलेली सर्व पुस्तके मराठीत असून त्यात चित्रमय, माहितीपूर्ण, कल्पनाशक्तीला चालना देणाऱ्या कथा आहेत. यंदाची थीम आहे – ‘मस्तक घडवते पुस्तक’, त्यामुळे मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारी पुस्तकेच संचात असतील. मागील वर्षी ‘वाचताना वेचू या… वेचलेले वाटू या’ ही संकल्पना होती.
वर्षभर हे विद्यार्थी एकमेकांमध्ये ही पुस्तके देवाणघेवाण करणार आहेत, आणि अशा रीतीने त्यांची स्वतःची एक वाचनसाखळी तयार होणार आहे. शाळा, शिक्षक, पालक आणि फाउंडेशन – सर्वांनी मिळून या साखळीला उर्जा द्यायची आहे.
या योजनेत यंदा सुमारे ५०० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा फाउंडेशनचा संकल्प आहे. वैयक्तिक व संस्थात्मक देणगीदारांच्या सहाय्याने ही योजना पूर्णपणे विनामूल्य राबवली जाते.
‘स्क्रीन टाइम’च्या अतिरेकाच्या काळात, मुलांच्या हाती पुन्हा पुस्तक द्यावं, त्यांच्या डोळ्यांना अक्षरांची ओळख करून द्यावी आणि मनात विचारांची जाणीव जागवावी – हीच या उपक्रमामागची भावना आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: ८८५६८६२७११





