प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॅरी ऑन लागू करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने नमते घेतले. किमान ५० टक्के क्रेडिटची अट पूर्ण न करू शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश देण्याचा निर्णय विद्यापीठाने अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केला. या निर्णयामुळे सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले असून, त्यांनी मोठा जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केले.विद्यापीठ नियमांनुसार पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के क्रेडिट मिळवणे अनिवार्य आहे. मात्र, २०२४-२५ या वर्षासाठी अनेक विद्यार्थी ही अट पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांतील हजारो विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश नाकारला होता.विद्यापीठाच्या विद्वत परिषद आणि व्यवस्थापन परिषदेने यावर चर्चा करून विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा विचार केला होता. मात्र, अधिकृत घोषणा रखडली होती. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत विद्यापीठात मोर्चा काढला. त्यांनतर प्रशासनाला तातडीने निर्णय जाहीर करावा लागला. तात्पुरता दिलासा; पण अट कायम.. विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, की हा दिलासा तात्पुरता आहे. विद्यार्थ्यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या परीक्षेत आपले अनुत्तीर्ण (बॅकलॉग) विषय उत्तीर्ण करणे बंधनकारक असेल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या दोन्ही सत्रांच्या परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. “विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी दीड महिन्यापासून सुरू असलेला लढा आज यशस्वी झाला. विज्ञान शाखेसह सर्व अभ्यासक्रमांना ही विशेष संधी मिळणार आहे. हा केवळ विद्यार्थी किंवा युवक काँग्रेसचा नव्हे, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा विजय आहे.” – अक्षय जैन, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (मीडिया विभाग)