पुणे | आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे : ठरलेल्या हिशोबापेक्षा चक्रवाढ पद्धतीने जास्त व्याज लावून पैशांची मागणी करीत, तसेच तुरुंगात पाठविण्याची धमकी देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश के. एन. शिंदे यांनी फेटाळला.
विनय विष्णूपंत काळे असे आरोपीचे नाव आहे. शशिकांत दत्तात्रय कातोरे (वय ४१ रा. वडगाव शेरी) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे वडील दत्तात्रेय साहेबराव कातोरे यांना फिर्याद दिली आहे. आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.
आरोपी विनय काळे हा पैशांची मागणी करून मयताला फोन करुन धमकावत असल्याबाबत साक्षीदार यांच्याकडे केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे, तसेच आरोपी याचे सीडीआर रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये मयताने आरोपीचे नाव व त्याने केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. मयताने वेळोवेळी आरोपीस युपीआय, तसेच एनएफटीद्वारे पेमेंट केल्याचे बँक स्टेटमेंटमध्ये दिसून येत आहे. त्याचा तपास करायचा आहे. आरोपीकडे सावकारी लायसन्स आहे का? याबाबत खात्री करणे बाकी आहे. त्यामुळे अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी केली होती





