आकाशचिन्ह विभागाचा अजब कारभार येरवडा : शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र, भले मोठे अनधिकृत जाहिरातींचे फ्लेक्स लावणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांकडे काणाडोळा करीत व्यावसायाच्या छोट्या जाहिराती लावणाऱ्यांवर आकाशचिन्ह विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातून या विभागाचा उरफटा कारभार समोर आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शहरात राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गल्लीबोळ, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा फ्लेक्स, बॅनर्स आणि जाहिराती लावल्या जात आहेत, त्यामुळे चौक आणि रस्ते या अनधिकृत फलकांनी अक्षरशः व्यापून गेले आहेत. माध्यमांमधून हे प्रकार प्रकाशझोतात आल्यानंतर महापालिकेने याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. मात्र, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने सुरूवातीला कारवाई न केल्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स उभारले गेलेले आहेत. वरिष्ठांनी निर्देश दिल्यानंतर अखेर या विभागाने पोलिसांना कारवाईचे पत्र पाठवले आणि सहा आस्थापनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील आणि मुख्य चौकातील फलक हटविण्यात आले. तथापि, हा परिसर विद्रुप करणाऱ्या राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मोठ्या ४० ते ५० फुटांच्या फ्लेक्सकडे दुर्लक्ष करून फक्त एक ते दोन फुटांच्या छोट्या जाहिरातींवर कारवाई केल्याने आकाशचिन्ह विभागाच्या निष्क्रीय भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अतिक्रमण निरीक्षक जाणीवपूर्वक राजकीय फलक लावणाऱ्यांना वाचवित असल्याचा आरोप केला जात आहे. प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात… महापालिकेच्या नियमानुसार, अनधिकृत जाहिरात लावल्यास प्रत्येक फलकावर हजार रुपयांचा दंड आकारला जाणार होता. तसेच दंड न भरल्यास संबंधितांना नोटीस बजावून त्यांना निवडणुकीसाठी आवश्यक एनओसी न देण्याचा नियम आहे. मात्र, कारवाई टाळल्याने बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांचा मार्ग सुकर झाला असून यामुळे प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.