Pune News : शहरात नुकत्याच झालेल्या राजकीय आंदोलनादरम्यान उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या घटनेला “अत्यंत दुर्दैवी” संबोधत पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी करून कायदा व सुव्यवस्था राखल्याचे स्पष्ट केले.आयुक्तांनी सांगितले की, आंदोलनादरम्यान परिस्थिती चिघळून दगडफेक झाल्याने तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणात दोन्ही पक्षांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून दोषींवर पुढेही कठोर कारवाई होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. पोलिसांना आंदोलन हिंसक होईल अशी पूर्वकल्पना नव्हती. “दगडफेक किंवा हिंसाचार होईल अशी कोणतीही गुप्त माहिती आमच्याकडे नव्हती. अशी माहिती असती तर परवानगी दिली नसती,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. पुढील काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयावर किंवा नेत्यांच्या निवासस्थानावर आंदोलन करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णयही त्यांनी जाहीर केला. महापौरवर गुन्हा दाखल का नाही? याबाबत विचारले असता आयुक्तांनी सांगितले की, पोलिसांकडे प्राप्त झालेल्या फिर्यादीच्या निवेदनानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपासात जो दोषी आढळेल त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल. काँग्रेस भवन आंदोलन परवानगीबाबत आयुक्त म्हणाले की, आंदोलन हिंसक होईल अशी माहिती नसल्यामुळे परवानगी देण्यात आली होती. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाणार आहे आणि अशा स्वरूपाच्या आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही. काँग्रेसच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पोलिसांनी नियमानुसार आणि कायद्यानुसारच कारवाई केली असून आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही.