पुणे – श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिट्री नर्सरी स्कूल, एस.एस.पी.एम.डे स्कूल & ज्यू.कॉलेज मध्ये भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा रंगला होता. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभुषेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ हा नामघोष करत टाळ, मृदुंग व चिपळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी ताल धरला. यावेळी पालखी सजवून दिंडी काढण्यात आली. शाळेचा अवघा परिसर ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून निघाला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकानेच फेर धरून, फुगड्या खेळून, रिंगण करून आनंद व्यक्त केला. पालखी व पताका खांद्यावर घेऊन, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात वारीचा अनुभव घेतला. या भक्तिमय सोहळ्याच्या आयोजनात मुख्याध्यापिका सुनीता शर्मा, अनुपमा गुंड, अन्नुमेरी दास, शितल खैरे, आरती पन्हाळकर, वंदना बहिरट, आयेशा पठाण, तृप्ती महाले यांचे मार्गदर्शन लाभले. एस.एस.पी.एम.डे स्कूल & ज्यू.कॉलेज मध्ये पालखी सोहळ्यात सोहळ्यात इयत्ता पाचवी ते आठवी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राचार्या शिवाली जगताप व पर्यवेक्षिका वैशाली राव यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. रिंगन सोहळ्यात बाल वारकऱ्यांनी जयघोष केला त्यानंतर अभंग गायन व कीर्तनाचा कार्यक्रम झाला. पर्यावरण वाचवा, साक्षरता जागृती, मुलींचे शिक्षण असा संदेश देणारी वारीही काढण्यात आली.