Pune News | ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ यशस्वी!रेल्वे स्थानकावर सापडलेली बालके सुरक्षित ; पालक येईपर्यंत शेल्टर होमचा आधार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आरपीएफच्या चाइल्ड हेल्प लाईन (सीएचएल) आणि एनजीओ साथी यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत आठ अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना शेल्टर होममध्ये सुरक्षित हलविले.रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) तर्फे वेळोवेळी रेल्वे स्थानक आणि गाड्यांमध्ये ऑपरेशन नन्हे फरिश्ते उपक्रमांतर्गत मोहिम राबविली जाते. त्यानुसार चाइल्ड हेल्प लाईन आणि साथी यांच्या रेल्वे स्टेशनवरील गस्तीवेळी ८ अल्पवयीन मुले पालक किंवा नातेवाईकांच्या गैरहजेरीत सापडली.
त्यांच्याकाडे चौकशी केल्यानंतर ही मुले त्यांच्या कुटुंबियांना न सांगता घराबाहेर पडल्याचे समोर आले. काहीजण मित्रांच्या सांगण्यावरून तर काहीजण वैयक्तिक कारणांमुळे घरातून पळून आल्याचे निदर्शनास आले. या मुलांचे लहान वय आणि असुरक्षितता लक्षात घेऊन, त्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले.वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशनानंतर मुलांना येरवडा येथील बालकल्याण समिती (सीडब्ल्युएस) येथे हजर केले. त्यांचे पालक येईपर्यंत तात्पुरत्या काळजीसाठी सात मुलांना साथी ओपन शेल्टर होममध्ये आणि एक मुलाला श्री साई सेवा ओपन शेल्टर होमकडे सोपवले आहे.
पालकांना आवाहन..
मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी सतर्क रहावे. तुम्हाला रेल्वे स्थनक परिसरात कोणतेही अल्पवयीन मूल एकटे किंवा संकटात आढळले तर ताबडतोब आरपीएफला कळवा. रेल्वे हेल्पलाइन १३९ आणि चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर डायल करा आणि निष्पापांना वाईट मार्गापासून वाचवा, असे आवाहन पुणे आरपीएफने केले आहे.





