Pune News : कर्णबधीर विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आवाजाचे नवे सूर

४०० अत्याधुनिक श्रवणयंत्रांचे वाटप
पुणे- पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आणि ‘ऑटोस इंडिया’ कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील ४०० श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आवाजाचे नवे सूर घुमले आहेत. तब्बल १.२८ कोटी रुपये किमतीची अत्याधुनिक श्रवणयंत्रे या विद्यार्थ्यांना विनामूल्य बसवण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम’ आणि शिक्षण विभागाच्या ‘समग्र शिक्षण अभियाना’मार्फत जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. या मुलांच्या भविष्यातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासातील अडथळा दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला.
या सामाजिक गरजेची दखल घेत ‘ऑटोस इंडिया’ या खासगी कंपनीने मदतीचा हात पुढे केला. या उपक्रमाला ‘स्वरूप चॅरिटेबल फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे तांत्रिक सहकार्य लाभले. या तिन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य श्रवणयंत्र वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात प्रत्येक मुलाची विशेष काळजी घेण्यात आली. ऑडिओलॉजिस्ट, डॉक्टर, विशेष शिक्षक आणि स्वयंसेवकांच्या पथकाने प्रत्येक मुलाची वैयक्तिक तपासणी केली. त्यांच्या श्रवणदोषाची तीव्रता तपासून त्यांना अनुरूप असे डिजिटल श्रवणयंत्र बसवण्यात आले. प्रत्येक श्रवणयंत्राची किंमत सुमारे ३२,००० रुपये असून, ही सर्व यंत्रे आणि संबंधित सेवा पूर्णपणे विनामूल्य पुरवण्यात आल्या.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, शासकीय संस्था, खासगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था यांनी एकत्र येऊन काम केले, तर समाजात खरा आणि शाश्वत बदल घडवता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या माध्यमातून या मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या या उपक्रमाचा भाग झाल्याचा अभिमान आहे.





