Pune News | गणेश विसर्जनासाठी महापालिकेची भव्य तयारी; सुरक्षा, आरोग्य, वाहतूक व्यवस्था चोख

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पुणे महापालिका यावर्षीच्या श्रीगणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. शहरातील प्रमुख विसर्जन घाटांवर तसेच कृत्रिम हौदांवर स्वच्छता, प्रकाशयोजना, वैद्यकीय सेवा, अग्निशमन यंत्रणा, जीव रक्षक, वाहतूक व्यवस्थापन यासह विविध विभागांकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन, अपघात टाळणे आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर देण्यात आला आहे. विसर्जन घाट तसेच मिरवणूक मार्गावर ३४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मिरवणूक संपेपर्यंत लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच, मिरवणूक काळात शहरातील स्वच्छतागृहे तीन वेळा स्वच्छ केली जाणार आहेत. विसर्जन घाटांच्या परिसरात मोबाईल टाॅयलेटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अग्निशमनदल..
विसर्जन काळात नदीपात्रात बुडण्याच्या घटना टाळण्यासाठी शहरातील १५ घाटांवर अग्निशमन कर्मचारी, अधिकाऱ्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. तब्बल ९० जीवरक्षक पाण्यात सतत गस्त घालणार असून प्रत्येक घाटावर दोरखंड, लाइफ जॅकेट, ट्यूब्स यांची पुरेशी व्यवस्था आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखोंचा जनसागर रस्त्यावर उतरणार असल्याने टिळक चौक आणि नटराज सिनेमा परिसरात विशेष संदेश केंद्र उभारले जात आहेत. यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्वरित मदत मिळणार आहे. मिरवणुकीच्या मार्गावर अग्निशमन गाड्या आणि पाण्याचे टँकरही तैनात राहणार आहेत.
विद्युत विभाग..
महापालिकेच्या विद्युत विभागाने विशेष नियोजन केले आहे. एकूण ४२९ विसर्जन घाटांवर ३७०८ एलईडी दिवे बसवले आहेत. १९७ जनरेटर, ३८८ स्पीकर आणि ३४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय करण्यात आली आहे. घाटांवर तसेच मिरवणूक मार्गांवर वीजपुरवठा खंडित होऊ नये याकरीता सर्व स्ट्रीटलाइट पोल, वायरिंग व ट्रान्सफॉर्मरची तपासणी पूर्ण झाली आहे. वीजजोडणीसाठी मंडळांना कायदेशीर परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून बेकायदेशीर वायरिंगवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
पथ विभाग..
विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी पथविभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मिशन ३२, अंतर्गत शहरातील महत्त्वाचे रस्ते रिसरफेसिंग करण्यात आले आहेत. टिळक रोड, लष्कर भाग, शिवाजीनगर परिसरातील मार्गांवर डांबरीकरण, खडी टाकणे, नालेसफाई यासह रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत. गर्दीच्या मार्गांवर पाणी साचल्यास लगेच उपसा करता यावा यासाठी अतिरिक्त पंपांची सोय केली आहे. नागरिकांना पीएमसी रोड मित्र या अॅपद्वारे तक्रारी नोंदवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मोटार वाहन विभाग..
मोठ्या मूर्तींचे संकलन आणि वाहतुकीसाठी महापालिकेने १०८ कंटेनर, ७६० ट्रक, २ पोकलेन व ४ जेसीबी उपलब्ध केले आहेत. वीज दुरूस्तीच्या कामासाठी ७ शिडीगाड्यांची सोय करण्यात आली आहे. मिरवणुकीच्या काळात सेवकांच्या ने-आणसाठी टेम्पो ट्रॅव्हलर व आवश्यक वाहनांची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर वाहने तैनात झाल्याने विसर्जनाची प्रक्रिया वेगवान आणि सुरळीत होणार आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभाग..
पर्यावरणपूरक विसर्जनावर महापालिकेने यावर्षीही विशेष भर दिला आहे. शहरात एकूण ३८ कृत्रिम हौद, ६४८ लोखंडी टाक्या, ३२८ निर्माल्य कलश उभारण्यात आले आहेत. याशिवाय २४१ मूर्तीदान केंद्रे व ४६ शाडू माती संकलन केंद्रांची स्थापना झाली आहे. सात स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शाडू माती गोळा करून पुढील वर्षीच्या मूर्तीकारांना पुरवण्यात येणार आहे. तसेच, संकलित निर्माल्यापासून जैविक खत तयार करून ते शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आरोग्य विभाग..
विसर्जन मिरवणुकीदरम्यान गर्दीमुळे अपघात, उष्माघात, अन्नातून होणारे आजार अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आरोग्य विभागाने ३० रुग्णवाहिका, १५ वैद्यकीय पथके, ८० डॉक्टर व २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. चौकात तीन आयसीयू बेडसह आरोग्य कक्ष तयार करण्यात आले आहेत. कमला नेहरू रुग्णालयात दहा खाटा केवळ विसर्जन काळासाठी राखीव ठेवल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणतीही तातडीची परिस्थिती हाताळण्यासाठी ही विशेष तयारी करण्यात आलेली आहे.
विसर्जन घाटांवर यंत्रणा तैनात..
गौरी विसर्जनाच्या दिवशी तब्बल १, ३२, ७२८ मूर्ती विसर्जित झाल्या. तर, पहिल्या सात दिवसांत १, ८५, ५३० मूर्तींचे विसर्जन झाले आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा आकडा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार विसर्जनांच्या ठिकाणी दोन दिवस अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.





