Pune News | पावसातही महापालिकेचा अतिक्रमणावर ‘हल्लाबोल’ ; ७० हजार चौरस फूट जागा केली मुक्त

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज मुसळधार पावसात औंध-बाणेर व धनकवडी-सहकारनगर या दोन विभागांत कारवाई करीत ७० हजार चौरस फूटपेक्षा जास्त क्षेत्र अतिक्रमणमुक्त केले. औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खडकी रेल्वे स्टेशन, भाऊ पाटील रस्ता, हॅरिस ब्रीज आदी ठिकाणी ९८ अनधिकृत शेड, हॉटेल, दुकाने, कच्चे-पक्के बांधकाम हटविण्यात आले. या कारवाईत तीन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. तंबू, लोखंडी जाळ्या, फ्रिज, काउंटर, टेबल, फर्निचर, लोखंडी कॉट आदींचा यात समावेश आहे.
दरम्यान, धनकवडी-सहकारनगर विभागातील कात्रज चौक परिसरातही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत २५०० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. सात शेड-झोपड्या, पाच लोखंडी काउंटर, दोन स्टील काउंटर, एक स्टॉल, एक हातगाडी तसेच अन्य साहित्य जप्त करून पाच ट्रक भरून नेण्यात आले. दोन्ही कारवाया अतिक्रमण उपआयुक्त संदीप खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.
औंध-बाणेर विभागात सहायक आयुक्त गिरीश दापकेकर तर धनकवडी-सहकारनगर विभागात सहायक आयुक्त सुरेखा भनगे यांच्या देखरेखीखाली मोहिम राबविण्यात आली. उपआयुक्त विजयकुमार थोरात, कनिष्ठ अभियंते, अतिक्रमण निरीक्षक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान व बिगारी सेवक अशा मोठ्या पथकांचा सहभाग होता.अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांवर यापुढेही वारंवार आणि मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.




