Pune News | एमपीएससीच्या उत्तरतालिकेचा गोंधळ ; विद्यार्थ्यांचे २८ गुण धोक्यात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षेच्या अंतिम उत्तरतालिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.उत्तरतालिकेत दोन्ही पेपरमधील एकूण १२ प्रश्न रद्द केले असून, इंग्रजीच्या २ प्रश्नांची उत्तरे बदलली आहेत.
यामुळे १४ प्रश्नांवर आणि विद्यार्थ्यांच्या २८ गुणांवर थेट परिणाम होणार आहे. यामुळे एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एमपीएससीने २०२५ पासून यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा पद्धती अवलंबण्याचा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात आयोगाच्या कारभारात ढिसाळपणा दिसून येत आहे.
यूपीएससी पूर्व परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करते, तर एमपीएससीला यासाठी दोन महिन्यांहून अधिक काळ लागतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षेच्या तयारीवर परिणाम होतो. यापूर्वीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ मध्येही २० प्रश्न रद्द आणि १३ प्रश्नांची उत्तरे बदलली होती. त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, प्रश्नपत्रिकांमधील शुद्धलेखन, भाषांतरातील चुका हे प्रश्न रद्द होण्याचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळूनही प्रश्नपत्रिकांमध्ये गुगल ट्रान्सलेटरचा वापर केल्याप्रमाणे सदोष भाषांतर आणि अशुद्ध लेखन मोठ्या प्रमाणात आढळते. याचा थेट फटका प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.
तथापि, सर्व प्रश्न तज्ज्ञांकडून तयार केले जातात आणि विद्यार्थ्यांच्या आक्षेपांची शहानिशा करूनच अंतिम निर्णय घेतला जातो. तसेच, भाषांतर आणि शुद्धलेखनाच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आयोगाने स्पष्ट ककेले आहे.
मात्र, विद्यार्थ्यांचा आयोगाच्या या प्रक्रियेवरील विश्वास उडाला असून, त्यांनी राज्य सरकारकडे परीक्षा पद्धती अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा चुका टाळून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी आयोगाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा उमेदवारांनी व्यक्त केली आहे.





