Pune News: आरोग्य चित्रपट महोत्सवात ‘मिसिंग’ आणि ‘वेनम वॉरियर’ ठरले सर्वोत्कृष्ट; रेणुका दफ्तरदार यांच्या हस्ते गौरव

प्रभात वृत्तसेवा
पुणे – समाजातील तळागाळापर्यंत कोणताही विषय पोहोचवण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे या माध्यमाचे महत्त्व सर्वाधिक असल्याचे मत अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांनी व्यक्त केले. पी. एम. शहा फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठानतर्फे आयोजित चौदाव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचा समारोप रेणुका दफ्तरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्या वेळी दफ्तरदार बोलत होत्या.
फाउंडेशनचे संचालक ऍड. चेतन गांधी या वेळी उपस्थित होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नुकताच हा दोन दिवसीय १४ वा आरोग्य चित्रपट महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवामध्ये तब्बल ३१ लघुपट पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली.चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती होत असून,
आरोग्याचा कठीण विषय चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचे महोत्सवाच्या माध्यमातून झाले आहे. आरोग्य हा विषय सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, त्यामुळे समाजातील तळागाळापर्यंत त्याच्याशी निगडित असणारे विषय चित्रपटाच्या माध्यमातून सहजपणे पोहोचू शकतात, असे दफ्तरदार यांनी नमूद केले.
करोनाच्या काळात सगळीकडे भयानक स्थिती होती.त्या वेळी रुग्णालयात असणाऱ्या मंडळींना ‘भाडिपा’ या युट्यूबवरील व्यासपीठावरून त्यांना आधार देण्याचे काम केले. त्याचा आजही विचार केला, तर हे माध्यम रुग्णांना आधार देण्यासाठी किती बलशाली ठरले, याचे प्रत्यंतर येते, असे दफ्तरदार म्हणाल्या.
आरोग्याचे विषय चित्रपट या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करताना त्यामध्ये तरुण मंडळींचा सहभाग चांगला होता. देशभरातून आलेल्या १५० चित्रपटांपैकी ३१ चित्रपट निवडून ते इथे दाखवण्यात आल्याचे ऍड. गांधी यांनी या वेळी सांगितले. सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.
महोत्सवातील विजेते चित्रपट
महोत्सवातील लघुपट विभागात मिसिंग या चित्रपटाने पहिला, लाइफ आफ्टर लॉस या लघुपटाने दुसरा, तर आनंदी या लघुपटाने तिसरा क्रमांक पटकावला, तर माहितीपट विभागात वेनम वॉरियरने पहिला, मंगलाचार या माहितीपटाने दुसरा तर व्ही. के. एम स्पेशल स्कूल या माहितीपटाने तिसरा क्रमांक पटकावला.





