Pune News : मेट्रोचा सप्टेंबरमध्ये उत्पन्नाचा नवा उच्चांक! चार महिन्यांत वाढलेली प्रवासी संख्या जपण्यात मेट्रोला यश
प्रभात वृत्तसेवा
पुणे – गणेशोत्सव आणि शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वाढत्या सहभागामुळे मेट्रोने सप्टेंबर संपण्याच्या तीन दिवस आधीच प्रवासी संख्या आणि आर्थिक उत्पन्नाचा नवा उच्चांक गाठला आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत (ता. २७) सुमारे ६९ लाख, ८६ हजार, ७७३ पुणेकरांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. त्यामुळे महामेट्रोला १० कोटी ७६ लाख, ८६ हजार ५१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे मेट्रोने ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीला मागे टाकले.
जूनमध्ये झालेल्या पालखी सोहळ्यामुळे पहिल्यांदा पुणे मेट्रोने ५० लाख प्रवासी संख्येचा टप्पा पार केला. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्याने जुलै महिन्यातही मेट्रो प्रवासी संख्या ६० लाख झाली. याच वेळी विद्यार्थ्यांसाठी मेट्रो स्मार्ट कार्ड मोफत करण्यात आले. २५ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत ही योजना सुरू होती. या काळात १० हजार विद्यार्थ्यांनी हे कार्ड घेतले. सध्या मेट्रो प्रवासी संख्येच्या १५ टक्के प्रवासी हे विद्यार्थी आहेत.
गणेशोत्सवात मध्यवर्ती पुणे वाहतुकीसाठी बऱ्यापैकी बंद होते, तसेच महामेट्रोनेही सेवेत अनेक महत्त्वाचे बदल केल्याने प्रवासी संख्या वाढली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशविसर्जनावेळीही मेट्रो सेवा सलग ४१ तास सुरू ठेवल्याने ५.९ लाख प्रवाशांनी एकाच दिवसात मेट्रोतून प्रवास केला. या सर्व आकडेवारीकडे पाहिले असता, प्रत्येक उत्सवामध्ये पुणे मेट्रोचा वापर वाढल्याचे दिसते. शिवाय उत्सवाच्या काळात वाढलेल्या प्रवाशांनी मेट्रोचा कायमस्वरूपी वापर केल्याचे दिसते.
जूनमध्ये पुणे मेट्रोची सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६५ हजार होती. पालखी सोहळ्यानंतर त्यात १० हजारांनी वाढ होऊन १ लाख ७५ हजारांवर गेली. जुलै महिन्यात सरासरी प्रवासी संख्या १ लाख ९५ हजारांवर, तर ऑगस्टमध्ये २ लाख ५ हजारांच्या आसपास होती. गणेश विसर्जनानंतर सरासरी प्रवासी संख्या २ लाख २५ हजार झाली आहे.



