Pune news : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सुरू असलेल्या दाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी (दि. ३१) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहिले. त्यांनी या गुन्ह्यातून दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे, असा अर्ज केला आहे. या अर्जावर बचाव पक्षाचा युक्तीवाद झाला. त्यानंतर उच्च, सर्वौच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल करण्यासाठी पुढील तारिख देण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणात जरांगे पाटील यांच्या वतीने ॲड. हर्षद निंबाळकर, मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. खंडेराव टाचले, ॲड. आकाश बिराजदार आणि सरकारी पक्षातर्फे ॲड. डी.सी.खोपडे काम पाहत आहेत. नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी दोषमुक्त करण्यासाठी जरांगे पाटील यांनी अर्ज केला आहे. मात्र, आजारपणामुळे मागील काही तारखांना जरांगे पाटील उपस्थित नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ते उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांच्या वतीने ॲड. हर्षद निंबाळकर, ॲड. शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात जरांगे-पाटील यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. फसवणूक करण्याचा त्यांचा कोणताही उद्देश नव्हता. बुक करण्यापूर्वीच आगाऊ ५ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच, नाटकाबाबत झालेल्या करारावर त्यांनी सह्या केलेल्या नाहीत. आरोप निश्चिती करण्यास पुरेसे असे पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांना गुन्ह्यातून वगळावे, असा युक्तीवाद ॲड. निंबाळकर यांनी केला. पुढील तारखेस निंबाळकर यांचा आणखी युक्तीवाद होणार आहे. त्यानंतर सरकारी वकील ॲड. डी.सी.खोपडे आणि मूळ फिर्यादीच वतीने ॲड. खंडेराव टाचले, ॲड. आकाश बिराजदार यांचा युक्तीवाद होणार आहे.