प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – घरगुती सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्यामुळे घरात एकटीच असलेली महिला भाजून गंभीर जखमी झाली आहे. या स्फोटामुळे पहिल्या मजल्यावरील घराची खिडकी तुटून खाली रस्त्यावर पडल्याने दुचाकीवरून चाललेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत आज सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. करूणा मनोज जगताप (41) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणाचे नाव समजले नाही. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करूणा जगताप या घरात एकट्याच होत्या. सकाळी गॅस गळती होऊन मोठा स्फोट झाला. दिवाळीला आणलेले फटाके घरात शिल्लक राहिले होते. ते ही यावेळी जोरात वाजले. या स्फोटात करूणा जगताप या होरपळल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की, घराचे दरवाजे, खिडकी तुटून पडले. तर घरातील काही वस्तू जळून गेल्या. यावेळी रस्त्यावरून दुचाकी चालली होती. त्याचवेळी हा स्फोट होऊन खिडकी खाली पडून एका तरुणाच्या हाताला गंभीर मार लागला आहे. घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे, उपनिरीक्षक पूजा माळी, सहायक फौजदार रामदास मेमाणे, हवालदार मंगेश नानापुरे, मल्हारी ढमढेरे तसेच लोणी काळभोरचे सरपंच नागेश काळभोर हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवली. दोन्ही जखमींना तत्काळ महाराजा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. करूणा जगताप यांची प्रकृती गंभीर तर तरुणाचा हात फ्रॅक्चर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.सिलेंडरमधून गॅस गळती, गिझर स्फोट, फटाके वाजल्याने की अन्य कोणत्या कारणाने हा स्फोट झाला आहे. याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळाची तपासणी पोलीसांच्या फॉरेन्सिक टीम केली आहे. त्यांच्या तपासातून स्फोटाचे नक्की कारण समजेल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.