Pune News | नेते आले, आश्वासन दिले, आम्ही अजूनही पूरातच

प्रभात वृत्तसेवा
पुणे – आमच्या घरात.. दुकानांमध्ये पाणी शिरले.. सहानभूती दाखवत राज्यातील नेत्यांनी आम्हाला नुकसानभरपाई आणि पुनर्वसनाचे आश्वासन दिले. त्याला आता वर्षाचा कालावधी लोटला असून त्यानंतर ना नेते फिरकले ना कार्यकर्ते. आम्ही आज पुराच्या पाण्यातच आहोत, अशा शब्दात बुधवारी एकता नगरी परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी २५ जुलै रोजी या परिसरात मोठा पूर आला होता. त्यावेळी १०० हून अधिक घरे तसेच दुकानांमध्ये पाणी शिरले होते.
त्यानंतर आता पुन्हा १९ ऑगस्ट रोजी या भागातील तीन ते चार सोसायटयांमध्ये पाणी घुसले होते. त्यानंतर पालिकेने या भागातील नागरिकांना हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच आपला रोष काढत बाहेर् पडण्यास नकार दिला. तसेच अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. नेतेही केवळ राजकीय फायद्यांसाठी आले होते का, असा संतप्त सवालही केला.
ना क्लस्टर ना सिमाभिंत..
गेल्या वर्षी एकतानगरीत पूरस्थिती उद्भवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रीया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांसाठी ठाणे शहराच्या धर्तीवर क्लस्टर डेव्हल्पमेंट करण्याचे जाहीर केले. त्यानुसार, पालिकेस प्रस्ताव तयार करण्य़ास सांगितले.
त्यानुसार, पालिकेने प्रस्ताव तयार करून नगरविकासमंत्री असलेल्या शिंदे यांच्या खात्याकडेच पाठविला आहे. मात्र, त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. तत्कालीन पालिका आयुक्तांनीही या भागात विशेष परवानगी घेवून नदीच्या कडेला सिमाभिंत बांधण्य़ाचा अथवा नदीकाठ विकसन प्रकल्प राबविणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पालिकेनेही काही केले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये कमालीची नाराजी होती.
वर्ष सरले, मदतही नाही..
या भागात पूरस्थिती उद्भवल्यानंतर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ पूरग्रस्त घरांचे तसेच व्यावसायिक अस्थापनांचे पंचनामे करून दोन दिवसांच्या आत मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, नागरिकांकडून आधारकार्ड, बॅंक खात्यांची माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी सातत्याने तहसिलदारांकडे मदतीच्या मागणीसाठी पाठपुरावाही केला. मात्र, शासनाकडून निधीच आलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता दुसरा पूर आला तरी अद्यापही पूरग्रस्तांना एका दमडीचीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे नाराजीत आणखीच भर पडलेली आहे.





