Pune News | लेक लाडकी कागदावरच ; पुण्यातील मुलींच्या जन्मदरात गंभीर घसरण

प्रभात वृत्तसेवा
पुणे : लेक लाडकी म्हणून घरोघरी मुलींचे कौतुक केले जात असले तरी पुण्यातील मुलींचा जन्मदर मात्र गंभीर चिंता निर्माण करणारा आहे. गेल्या चार वर्षांत मुलींचा जन्मदर प्रतीहजार ९४६ वरून ९११ पर्यंत खाली आला आहे. यामध्ये महापालिकेचा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग कमी पडतो की काय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. चार वर्षांत प्रती हजार ३५ ने झालेली घसरण नक्कीच गंभीर आहे. या प्रकाराची तातडीने शहानिशा करावी अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पालिकेकडे केली आहे.
याबाबतचे कायदे व नियम कडक असले पुण्यासारख्या शहरात घसरणारा जन्मदर ही चिंताजनक बाब असल्याने याची खातरजमा करण्याची मागणी पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.वेलणकर म्हणाले की, माहिती अधिकार दिनानिमित्त पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २०२० साली हजार मुलांमागे ९४६ मुलींचा जन्मदर नोंदला गेला. त्यानंतर चार वर्षांत हा दर घटून हजार मुलांमागे ९११ वर आला आहे.
शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे वेलणकर यांनी नमूद केले. हजार मुलांमागे किमान ९५० मुलींचा जन्मदर हा सामाजिक आरोग्यासाठी योग्य मानला जातो.गेल्या काही वर्षांतील घसरण दखलपात्र असून पालिकेचा गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक विभाग आपले कामकाज प्रभावीपणे करतो का, याची तपासणी झाली पाहिजे.
गेल्या चार वर्षात मुलींचा जन्मदर घटला आहे. एका बाजूला महापालिका जन्मदर वाढविण्य़ासाठी जनजागृती करत असल्याचे सांगते.मात्र, त्यानंतरही हा दर घटत असेल तर कुठेतरी शंका निर्माण होणे साहजिक आहे. शहरात अनेक शासनमान्य गर्भपात केंद्र आहेत. तसेच अनेक रूग्णालयांत सोनोग्राफी सेंटर आहेत. त्यांची तपासणी अधिक कडकपणे व्हायला हवी. – विवेक वेलणकर ( अध्यक्ष, सजग नागरिक मंच)
अशी झाली घसरण
वर्ष जन्मदर
– २०२० – ९४६
– २०२१ – ९१०
-२०२२ – ९१०
-२०२३ – ९०६
-२०२४ – ९११





