पुणे : शहरात सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असतानाच, शनिवारी मध्यरात्री कोंढव्यातील साईनगरमधील व्यंकटेश सरोवर सोसायटीमध्ये कोयता गँगने धुमाकूळ घातला. सोसायटीचा जिन्याचा दरवाजा बंद असल्याने आरोपींना प्रवेश मिळाला नाही. मात्र, ते थेट पार्किंगमध्ये गेले आणि तेथे रहाणाऱ्या रखवालदारावर कोयत्याने व एअर गन दाखवून दहशत माजवली. आरोपींनी रखवालदाराचे दोन मोबाईल फोन व रोकड रक्कम लुटून पलायन केले. गुन्हेगारांच्या हातात मोठे कोयते व एअर गन असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रहिवासी भयभीत झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मात्र, सतत सुरू असलेल्या गोळीबार आणि कोयत्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे गुन्हेगारांना खाकीची भीती राहिलेली नाही, अशी चर्चा शहरात सुरू आहे. रहिवाशांचा सवाल : पोलिसांनी काही गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या आवळल्या तरीही त्यांचा दहशतीचा खेळ सुरूच असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.