Pune News : सायकल स्पर्धेसाठी नियमबाह्य धावपळ ; मंजुरीपूर्वीच पालिकेकडून रस्त्याच्या कामाला सुरूवात

प्रभात वृत्तसेवा
पुणे – टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही स्पर्धा जानेवारी २०२६ मध्ये होणार आहे. या स्पर्धेचा ७५ कि. मी. लांबीचा मार्ग शहरातून जाणार आहे, त्यासाठी रस्ते डांबरीकरण, चेंबर व पादचारी मार्गांची दुरुस्ती तसेच इतर सुधारणा करण्यात येणार आहेत. या कामांसाठी तब्बल १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च होणार असून त्यासाठीची निविदा मंजूर होण्यापूर्वीच हे काम शहरात सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते विकसित केले जाणार असल्याने रस्ते खरवडून त्यावर डांबरीकरण केले जात आहे.
शहरात १९ ते २३ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. याकरीताच्या रस्त्यांचे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. विधी महाविद्यालय रस्ता, बाणेर तसेच मुकुंद नगर परिसरात रस्ते खरवडणे (मिलिंग) काम सुरू आहे. हे काम रात्री केले जात असल्याने असे रस्ते दिवसा वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. वाहने सावकाश चालवून सहकार्य करावे, असे आवाहन पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी केले आहे.
नियमबाह्य प्रक्रिया..
या स्पर्धेसाठी आवश्यक रस्त्यांच्या कामासाठी पालिकेच्या पूर्वगणक समितीत मान्यता दिली आहे. त्यानुसार, प्रशासनाने दिड महिन्यापूर्वी अवघ्या सात दिवसांच्या मुदतीची निविदा मागविली. मात्र, महिनाभराचा कालावधी लोटला तरी ही निविदा स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेली नाही. कामास विलंब होण्याची भिती व्यक्त करत केवळ सात दिवसांत निविदा काढण्यात आली, त्यानंतर मान्यता नसल्याने काम दिल्या जाणाऱ्या ठेकेदारास लेटर आॅफ इंटेट देत काम सुरू करण्यात आले तर पुढील आठवड्यात होणाऱ्या समितीच्या बैठकीत ही निविदा मंजूर केली जाणार आहे.
खोदाईची जबाबदारी कोणाची ?
या स्पर्धेसाठी अद्याप दोन महिन्यांचा कालावधी असताना पालिकेकडून आताच रस्ते खोदाई सुरूकेली आहे, याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे रस्ते केल्यानंतर पुढील दहा वर्षे त्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असणार आहे. समान पाणी योजना, ड्रेणेज विभाग, महावितरण, पोलिसांचे सीसीटीव्ही प्रकल्प खोदाई यासाठीची कामे सुरू आहेत. अशा स्थितीत या विभागांनी खोदाई केल्यास हे रस्ते पुन्हा खराब होणार आहेत. मात्र, त्यासाठी या विभागांमध्ये समन्वया पलिकडे पथविभागाकडून इतर कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नाही.




