Pune News – भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांडच्या औंध मिलिटरी स्थानकावर संयुक्त कवच या आठवडाभर चाललेल्या सैन्य-नागरी एकत्रित सरावाचा समारोप देशाचे रक्षा राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत झाला. या सरावात, शहरी वातावरणात रासायनिक हल्ल्याच्या अनुकरणाद्वारे राष्ट्रीय सुरक्षा तयारीचा एकात्मिक प्रतिसाद दाखविणारा व्यापक सराव आणि प्रदर्शने दाखवण्यात आली. या सरावात भारतीय लष्करासह, भारतीय वायूसेना, जिल्हा प्रशासन, पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, एनसीसी आणि इतर अशा एकूण १९ संस्थांचा सहभाग होता. सैन्य आणि नागरी संस्थांमध्ये सहकार्य वाढवणे आणि बदलत्या परिस्थितीमध्ये जटील आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी सक्षम करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. या सरावाचा भाग म्हणून शहरात झालेल्या रासायनिक हल्ल्यानंतर एकत्रित काम करीत परिस्थिती नियंत्रणात कशी आणायची याचे प्रदर्शन करण्यात आले. या वेळी जलद गतीने धोका ओळखणे, धोकादायक जागेला गराडा घालत विलगीकरण करणे, त्या जागेला प्रदूषणमुक्त करणे, जखमींना वैद्यकीय सेवा पुरवणे आणि इतर अनेक प्रक्रियांचा अभ्यास करण्यात आला. या सरावाने रासायनिक, जैविक, किरणोत्सारी आणि आण्विक आपत्कालीन स्थितीमध्ये प्रभावी विविध संस्थांची एकत्रित प्रतिसाद देण्याची क्षमता दाखवण्यात आली. यामुळे विविध संस्थांमधील परस्पर संवाद आणि समन्वयात्मक प्रतिक्रिया प्रणाली मजबूत झाली.