Pune News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कोंढव्यापर्यंत जाणार! तीन महिन्यात प्रकल्प अहवाल तयार..जाणून घ्या सविस्तर
प्रभात वृत्तसेवा
पुणे – हिंजवडी- शिवाजीनगर मार्गिकेचा कोंढव्यापर्यंत विस्तार केला जाणार असून त्याचा प्रकल्प अहवाल तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. अहवाल राज्य आणि केंद्राला सादर होणार आहे. या मार्गिकेला जोडून छोटी मार्गिका एनआयबीएम भागात तयार होणार आहे.हिंजवडी- शिवाजीनगर मार्गिकेचे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आले असून सार्वजनिक- खासगी भागीदारीतून तयार होत असलेली ही मार्गिका मार्च २०२६ मध्ये सुरू होईल असे या मार्गिकेचे व्यवस्थापन दिलेल्या केओलिस कंपनीने म्हटले आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर पुढे २० किलोमीटरचा विस्तार केला जाणार असून ती दक्षिण पुण्यातील कोंढव्यापर्यंत नेण्याचा विचार आहे.
या मार्गिकेमुळे कोंढवा, येवलेवाडी आणि एनआयबीएम भागातील वाहतूककोंडी कमी होईल. मात्र, त्या मार्गाचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. यात प्रकल्पाची व्याप्ती, तांत्रिक तपशील, मार्गाचे संरेखन, एकूण स्थानके, रोलिंग स्टॉक, खर्चाचा अंदाज (लागणारे भांडवल आणि व्यवस्थापनीय खर्च), व्यवहार्यता, लागणाऱ्या जमिनीची आवश्यकता, पर्यावरणीय परिणाम आणि सामाजिक-आर्थिक फायदे अशा बाबी तपासून पाहिल्या जातील. या मार्गिकेसाठी अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढण्याचे आदेश मेट्रोला दिले आहे.



