प्रभात वृत्तसेवा पुणे – पीएमपीच्या ताफ्यात ई-बस दाखल झाल्या असून प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ई-बसचा प्रवास म्हणजे वातानुकूलीत प्रवास असल्यामुळे सर्वच मार्गावरील ई-बसला प्रवाशांची मोठी गर्दी असते. या ई-बसमुळे जवळपास ५० हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन घटल्याने प्रदूषण कमी झाले आहे. त्यामुळे राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार परिवहन विभागाने पीएमपीला प्रोत्साहन निधी म्हणून ९८ कोटी मंजूर केले. त्यापैकी तीन कोटी २० लाख रुपये पीएमपीला देण्यात आले असून, पुढील निधी टप्यटप्याने मिळणार असल्याची माहिती पीएमपीचे व्यावस्थापकीय संचालक व अध्यक्ष पंकज देवरे यांनी दिली.पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत पीएमपीकडून प्रवासी सेवा दिली जाते. सध्या पीएमपीच्या ताफ्यात दोन हजारांहून अधिक बस आहेत. त्यातील १८०० ते १९०० बस विविध मार्गांवर धावतात. त्यामधून दिवसाला साधारण दहा लाख नागरिक प्रवास करतात. एकूण बसपैकी पीएमपीत ४९० ई-बस तर अन्य बस सीएनजीवर आहेत. २०१९ मध्ये पीएमपीने ई-बस घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५० बस दाखल झाल्या. त्यानंतर केंद्र सरकारच्या फेम एक व फेम दोन योजनेनुसार पीएमपीमध्ये ६५० बस दाखल होणार होत्या. त्यातील ४९० बस दाखल झाल्या आहेत. पीएमपीच्या हद्दीत एकूण सात ई-डेपो उभारण्यात आले आहेत. त्यापैकी भेकराईनगर, निगडी, बाणेर, वाघोली, पुणे स्टेशन, चऱ्होली, हिंजवडी टप्पा-२ असे सात आगार (डेपाे) आहेत. सध्या संचलनात असलेल्या ४९० ई-बसच्या माध्यमातून विविध मार्गांवर प्रवासी सेवा दिली जाते. आतापर्यंत जवळपास सात कोटी ६० लाख इतका किलोमीटर प्रवास झाला आहे. त्यामुळे ५० हजार मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन घटल्याने प्रदूषण कमी झाले आहे.