pune news : ‘कात्रज कोंढवा रस्त्यावर खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू’; तीन मुलींना वाचविण्यात यश

कोंढवा (प्रतिनिधी) – कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात चार मुली पडल्याची घटना शनिवारी (ता. ८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गगन उन्नती सोसायटीसमोर महाकाली मंदिराजवळ असणाऱ्या १५ फूट खड्ड्यामध्ये या मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असता पडल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असून त्या ठिकाणी महाकाली मंदिराजवळ काही लोक तातपूरत्या स्वरूपाच्या झोपड्या टाकून राहतात. त्यामुळे शेजारी असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात येथील महिला व मुली कपडे धुण्यासाठी जात असतात.
कपडे धुण्यासाठी गेले असता, खड्ड्यामध्ये पाय घसरून मुली पडल्यायाची माहिती प्रत्यक्षदर्शिनी अग्निशमन दलला व पोलिसांना दिली. तोपर्यंत स्थानिकांनी तीन मुलींना बाहेर काढले होते. मात्र, एका मुलीला वाचविण्यात अपयश आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चौथ्या मुलीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.
सरगम शिळावत (वय १५), सेजल शिळावत (वय १३), जानू शिळावत (वय १५) अशी पाण्यातून बाहेर काढलेल्या तर मुस्कान शिळावत (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. कोंढवा अग्निशामक दलाकडून ड्रायव्हर समीर तडवी, तांडेल दशरथ माळवदकर, फायरमन प्रकाश शेलार, अभिजीत थळकर, विश्वजीत वाघ यांनी मुलीचे शोधकार्य केले.
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम गेल्या अनेक महीन्यांपासुन खुप संथ गतीने सुरू असून इस्कॉन चौक येथे भुयारी मार्गाचे काम चालु आहे. तेथे १५ ते २० फूट खड्डा खोदला असुन त्या खड्डामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. याठिकाणी कोणतीही सुरक्षायंत्रणा नसल्याने या खड्डामध्ये परिसरातील ४ युवती पाण्यात पडून बुडाल्या असून यातील १ युवती मुत्यूमुखी पडली आहे.
तरी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाच्या माजी नगरसेविका संगीता ठोसर यांनी केली आहे.





