Pune News : महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर ; खराडी-वाघोलीत मोठा बदल,उमेदवारांसाठी नवीन आव्हान

प्रभात वृत्तसेवा
वाघोली – आगामी निवडणुकीसाठी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने निवडणूक आयोगाने या हरकतींचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले असून प्रभागांची नावेही बदलली आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक तीन विमाननगर-लोहगावमध्ये कोणताही बदल झाला नसल्याने जैसे थे असून प्रभाग क्रमांक चार खराडी-वाघोलीमध्ये बदल झाला आहे. थिटे वस्ती या प्रभागाला जोडल्याने प्रभाग क्रमांक चार आणखीन मोठा झाला आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार आहे.
महापालिकेने (दि.२२) ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यानंतर ११ व १२ सप्टेंबर रोजी यावर मागवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीला फक्त ८२८ नागरिक उपस्थित राहिले होते. एकूण ५ हजार ९२२ हरकती आल्या होत्या. यापैकी ४ हजार ५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या. १३२९ हरकती पूर्णतः मान्य झाल्या. तर ६९ हरकती या अंशतः मान्य करण्यात आल्या. प्रभाग क्रमांक तीन विमाननगर-लोहगावमधून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करण्यात आल्या होत्या.
मात्र, या प्रभागात बदल झालेला नाही तर प्रभाग क्रमांक चार खराडी-वाघोलीमधून कमी हरकती आल्या होत्या. या प्रभागात बदल झालेला असून प्रारूप प्रभाग रचनेतील प्रभाग क्रमांक पंधरा मांजरी बुद्रुक-साडेसतरानळीमधील थिटे वस्तीचा भाग अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक चार खराडी – वाघोलीला जोडला आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक चार आणखीन मोठा झाला आहे. थिटे वस्तीचा भाग भौगोलिक दृष्ट्या तसेच नागरिकांच्या सोयीनुसार प्रभाग क्रमांक पंधराला जोडणे योग्य नसल्याने यावर हरकती आल्या होत्या. त्यानुसार बदल झाला आहे.
निवडणूक आयोगाच्या २०११ आकडेवारी नुसार प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या ९२२८३ आहे. अनुसुचित जातीची लोकसंख्या १२८६१ तर अनुसुचित जमातीची लोकसंख्या १०३७ आहे. थिटे वस्तीचा भाग जोडला गेल्याने अंतिम प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक चारची लोकसंख्या ९७१८७ झाली आहे. अनुसुचित जातीची लोकसंख्या १३६१६ तर अनुसुचित जमातीची लोकसंख्या १०९८ झाली आहे.
हरकती जादा, मात्र, बेदखल..
महामार्गाच्या डाव्या बाजूला असताना वाघोली गावठाणाचा भाग प्रभाग क्रमांक चारला जोडण्यात आला आहे. गावठाण प्रभाग क्रमांक तीनमध्ये समाविष्ठ करण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी हरकती दिल्या होत्या. मात्र, यामध्ये कोणताही बदल झालेला नसून गावठाणाचा भाग प्रभाग चारमध्ये ठेवण्यात आला आहे.





